Ad will apear here
Next
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे. आज दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने, या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
............
श्लोक पहिला

दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलं
प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु।।१।।

भावार्थ : मोठ्या मनाचा, अपेक्षित वर देणाऱ्या, भक्तांवर प्रेम करणाऱ्या, पीडितांचे दु:ख नाहीसे करण्याची क्षमता असणाऱ्या अत्रिपुत्र दत्ताला मी वंदन करतो. स्मरण करताक्षणीच धावून येणारा, तो माझे रक्षण करो. 

दत्तात्रेय :
हे स्तोत्र समजून घेण्यासाठी पहिल्या श्लोकापासून सुरुवात करू या. या श्लोकातला पहिला शब्द आहे ‘दत्तात्रेय’. हाच या स्तोत्राचा मूळ हेतू आहे. 

या मूळ हेतूसाठी नऊ श्लोक आणि २९ विशेषणे वापरून हे स्तोत्र रचण्यात आले आहे. पहिल्या श्लोकात ज्यांचा उल्लेख आहे, ते ‘दत्तात्रेय’ कोण आहेत आणि या शब्दात कोणता गर्भित अर्थ दडलेला आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. असा उल्लेख आढळतो, की अत्री ऋषींचा उद्भव ब्रह्मदेवांच्या नेत्रांपासून झाला. ह्या युगाचे जे सात महर्षी वर्णिले आहेत, त्या सप्तर्षींमध्ये अत्री ऋषींचं स्थान तिसरं आहे. अत्रींप्रमाणेच सती अनसूयेच्या उद्भवाचा उल्लेखही पौराणिक वाङ्मयात आढळतो. मनू-शतरूपाची मुलगी देवहुती. तिला एकंदर नऊ कन्या आणि एक पुत्र झाला. सांख्यदर्शनाचे रचनाकार महर्षी कपिल हेच देवहुतीचे पुत्र, असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. देवहुतीला ज्या नऊ कन्या झाल्या त्यांच्यापैकी एक अनसूया. याप्रमाणे देवहुतीपासून उद्भवलेले बहीण-भाऊ म्हणजे अनसूया आणि कपिल महर्षी. असूयाविरहित असलेल्या अनसूयेने ब्रह्मा-विष्णू-महेश या तीनही देवांना प्रसन्न केलं आणि त्यांच्या वरदानाची परिणती म्हणून त्रिदेवांचा जन्म झाला. 

अत्री ऋषी आणि माता अनसूयेला झालेले त्रिदेवात्मक तीन पुत्र म्हणजे ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने झालेला चंद्र, भगवान शंकराच्या आशीर्वादाने झालेले दुर्वास आणि महाविष्णूंच्या आशीर्वादाने झालेले भगवान् दत्तात्रेय! यांपैकी चंद्र आणि दुर्वास अशा दोन ईश्वरी रूपांनी आपली शक्ती भगवान दत्तात्रेयांना दिली आणि ते स्वतः तप करण्यासाठी निघून गेले. केवळ महाविष्णू दत्तात्रेयरूपाने इतर दोन शक्तींसहित शिल्लक राहिले. याप्रमाणे महाविष्णूंच्या रूपात ब्रह्मदेव आणि शंकर या दोघांचीही शक्ती विलीन झाली. ‘अहं तुभ्यं मया दत्त:’ असं म्हणत सर्वस्वाचं दान करण्याची क्षमता असणारे हे भगवान् दत्तात्रेय म्हणूनच त्रिगुणात्मक मानले जातात. 

विविध धर्मग्रंथांतून आणि पौराणिक ग्रंथांतूनही दत्तात्रेयांवर अनेक प्रकारचे संदर्भ आढळतात. आपल्या पारंपरिक वाङ्मयामध्ये दत्तात्रेयांविषयी असलेले विविध संदर्भ, उल्लेख यांची माहिती दत्तात्रेयांची भक्ती करणाऱ्यालाच नव्हे, तर सर्वांनाच असायला हवी. आपण कोणाची पूजा करतो आहोत, कोणाची उपासना करतो आहोत, कोणाचं ध्यान करतो आहोत आणि ज्याची उपासना करतो आहोत, ते भगवान दत्तात्रेय किती शक्तिमान आहेत, त्यांची काय ख्याती आहे, याची माहिती असणं अनिवार्य आहे. अन्यथा भगवान् दत्तात्रेयांच्या उपासनेसाठी आवश्यक असलेला भाव उत्पन्न होणार नाही. म्हणूनच पारंपरिक वाङ्मयातून आलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या विविध उल्लेखांचा मागोवा घेणं उद्बोधक ठरेल. 

थोरल्या स्वामी महाराजांनी रचलेल्या दत्तपुराणात दत्तजन्माबद्दल विस्तृत वर्णन आहे. त्यात ‘अत्री’ म्हणजे त्रिगुणातीत चैतन्य आणि अनसूया म्हणजे परा प्रकृती असा अन्वयार्थ स्वामी महाराजांनी दिला आहे. याचा अर्थ त्रिगुणातीत चैतन्याच्या पराप्रकृतीशी झालेल्या मीलनातून ज्या त्रिगुणात्मक शक्तीचा सगुणाकार उद्भव झाला ते म्हणजे श्री दत्तात्रेय. अतिप्राचीन काळी रुद्रावर भाष्य करणाऱ्या जाबाल ऋषींनी आपल्या जाबालोपनिषदात दत्तात्रेयांविषयी विस्तृत माहिती देऊन त्यांचा उल्लेख ‘महायोगी’ असा केला आहे. दत्तात्रेय उपनिषदात त्यांना ‘महानारायण’ या महाविष्णूंच्या नावाने संबोधलं आहे. तो तारकब्रह्म आहे, स्वतः पूर्ण ब्रह्म आहे. परंतु लीलावतारासाठी काही वेळेला दर्शन देतो म्हणून तो ‘स्मर्तृगामी’ आहे, असाही त्यांचा उल्लेख आहे. 

शिवपुराणामध्येदेखील भगवान दत्तात्रेयांचा ‘त्रेतायुगातील विश्वगुरू’ म्हणून उल्लेख केलेला आहे. आजही कुठलीही गुरूपरंपरा ही भगवान दत्तात्रेयांपासून सुरू झालेली आढळते. भगवान दत्तात्रेयांना परम गुरू, परात्पर गुरू आणि इतर अनेक संबोधनं दिली जातात. कारण गुरूपरंपरा मुळात भगवान दत्तात्रेयांपासून सुरू झाली आहे. गुरुचरित्रकारांनी भगवान दत्तात्रेयांचं फार सुंदर वर्णन केलं आहे...

भक्तानुग्रहकृन्नित्य: पापतापार्तिञ्जन:।
बालोन्मत्तपिशाचाभ: स्मर्तृगामी दयानिधी:।।

मूळ गुरुचरित्रामध्ये उल्लेखलेला हा ‘स्मर्तृगामी’ शब्द या स्तोत्रामध्ये स्वामी महाराजांनी पुन: वापरला आहे. गुरुचरित्रातल्या या श्लोकाचा अर्थ असा, की भगवान् दत्तात्रेय भक्तांवर नित्य अनुग्रह करतात आणि मनापासून स्मरण करताच लगेच प्रकट होतात. तसेच ते भक्तजनांच्या पापांचं आणि त्रितापांचं निवारण करणारे, अंतर्यामी बालकाप्रमाणे सम आणि निर्लेप वृत्तीचे आणि बाह्यत: उन्मत्त किंवा पिशाच्चाप्रमाणे दृष्टीस पडणारे, असे आहेत. प्राकृत भाषेतील गुरुचरित्रातही या श्लोकातील वर्णनाप्रमाणे भगवान् दत्तात्रेयांचे अनेक उल्लेख आढळतात. या सर्वांचा सारभूत अर्थ एवढाच, की श्री दत्तात्रेय कायम अनुग्रहासाठी सिद्ध आहेत, फक्त लायक मनुष्य किंवा शिष्य मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. 

श्री दत्तभक्तीच्या अजून एका वैशिष्ट्याचा इथे उल्लेख करावा लागेल. आजही भगवान दत्तात्रेयांच्या कित्येक मंदिरांमध्ये, मठांमध्ये जसे हिंदू भक्त जातात, तसेच मुसलमान भक्तही जाताना आढळतात. इतिहासाचं सखोल चिंतन केलं, तर यामागच्या कारणाचं आकलन होतं. मोगलशाही किंवा त्यानंतर आलेल्या अनेक मुसलमानी राजवटींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हिंदू मंदिरांचं भञ्जन झालं. परंतु यात दत्तमंदिरांचं भञ्जन फार कमी प्रमाणात झालं. विशेषतः जिथे मूर्तीऐवजी खडावांची, पादुकांची स्थापना केली होती, ती मंदिरे अबाधित राहिली.

सारांशाने ऐतिहासिक काळात हिंदू धर्माची हानी रोखण्याचा सर्वांत मोठा प्रयत्न दत्तसंप्रदायाने केला आणि त्यात अग्रभागी होते स्वतः भगवान दत्तात्रेय! इतिहासातील नोंदीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुसलमान भक्तांना त्याप्रमाणे विशेष प्रेरणा दिलेल्या आढळतात. अर्थात त्यामुळे परकीय राजवटीतही हिंदू धर्म इतपत तरी शिल्लक राहिला, असं म्हणण्यास हरकत नाही. अशा प्रकारे स्वधर्माचा उद्धार साधणाऱ्या भगवान दत्तात्रेयांनी विष्णुरूपाच्या आश्रयाने अवतीर्ण होऊन मानवावर खरोखरीच अनंत उपकार केले. ज्याप्रमाणे आद्य शंकराचार्य जर झाले नसते, तर हिंदू धर्म संपला असता, त्याचप्रमाणे प्राचीन काळात अवतीर्ण झालेल्या भगवान् दत्तात्रेयांनी अर्वाचीन काळात जर लीला दाखवल्या नसत्या, त्यांच्या भक्तांनी जर काही सत्कर्म केलं नसतं, तर आज आपणही हिंदू म्हणून टिकलो नसतो. अलीकडच्या काळात स्वधर्म स्थापना करण्याचं फार मोठं कार्य या ‘दत्तात्रेय’ नावाभोवती गुंफलं गेलं आहे आणि ते वास्तव आहे. 

भगवान दत्तात्रेयांच्या शिष्यांची जंत्री पाहिली तर लक्षात येतं, की देवांपासून दानवांपर्यंत, राजापासून रंकापर्यंत, ज्ञानी माणसापासून अडाणी माणसांपर्यंत, भक्तापासून नास्तिकापर्यंत, असे सगळ्या प्रकारचे शिष्य त्यात आहेत. आजही भगवान दत्तात्रेयांचे असे विविधांगी भक्त सगळीकडे भेटतात. भगवान कार्तिकेय, गणेश, प्रल्हाद, यदु, अलर्क, परशुराम, सहस्रार्जुन म्हणजेच कार्तवीर्य हे सगळे भगवान दत्तात्रेयांचे शिष्य गणले जातात आणि या सगळ्यांनी फार मोठं कार्य केलेलं आढळून येतं. भगवान दत्तात्रेयांचे प्रमुख शिष्य म्हणजे परशुराम. हे आजपर्यंत विचरण करत राहिले असून, अजूनही भक्तांना दिशा दाखवतात असा अनुभव आहे. 

अगदी असाच अनुभव भगवान दत्तात्रेयांच्या बाबतीतही कित्येक जणांना आल्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा, की भगवान् दत्तात्रेयांनी आपल्या शिष्याला म्हणजे परशुरामांना आपली सगळी शक्ती दिली आणि त्यांनीदेखील सद्गुरूंच्या प्रेरणेने फार मोठं कार्य केलं. स्वधर्म स्थापनेबरोबरच वेद-वाङ्मयाचा उद्धार करणं हे कार्यही भगवान् दत्तात्रेयांनी केलं. ठिकठिकाणी वेदपाठशाळांची स्थापना करणं, विद्यार्थ्यांना संथा देऊन प्राचीन वेदवाङ्मय आणि वेदमंत्र आजपर्यंत टिकवून ठेवणं यामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या लीलांचा सहभाग फार मोठा आहे. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या भक्तांकरवी या प्रकारचं कार्य केलं आहे. 

भगवान् दत्तात्रेयांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे शैव, वैष्णव आणि हिंदू-मुस्लिम ही आपल्या समाजातील द्वंद्वं दूर करण्यासाठी त्यांच्या प्रेरणेने झालेले विविध प्रयत्न. विशेषतः दत्तसंप्रदायाच्या उपसंप्रदायांपैकी एक असणाऱ्या नाथसंप्रदायाने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं हे काम मोठ्या प्रमाणावर केलं आहे. 

प्रतीकविज्ञान :
भगवान दत्तात्रेयांच्या प्रतीकाचा जर विचार करायचा झाला, तर भगवान दत्तात्रेयांची प्रतिमा ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन तेजांनी युक्त असलेली प्रतिमा आहे, ज्यामध्ये सोम आणि दुर्वास यांनी शक्ति-समर्पण केलं आहे. त्रिमूर्ती स्वरूपातल्या दत्तप्रतीकाचा मूळ उल्लेख दत्तोपनिषदामध्ये किंवा जाबालदर्शनोपनिषदामध्ये आढळतो. पुराणग्रंथातून ज्याप्रमाणे श्रीगणेशाचं वर्णन आढळतं, त्याप्रमाणे भगवान दत्तात्रेयांचं वर्णनही असं केलेलं आहे, की प्रणवाच्या अ, उ आणि म या तीन मात्रा म्हणजे भगवान दत्तात्रेयांचं एक एक मुख आहे. अ, उ आणि म यांच्या एकत्रीकरणातून हे विश्व निर्माण झालं. अध्यात्मातील या तीन मात्रांना आधुनिक विज्ञानाच्या भाषेत मांडायचं झालं, तर लघु, मध्यम आणि दीर्घ या तीन तरंगलांबीच्या लहरींवर सबंध विश्वाची उभारणी झाली आहे. 

या तीनही मात्रा तीन मुखांच्या रूपाने एकत्रित रीतीने भगवान् दत्तात्रेयांमध्ये अवतीर्ण आहेत. त्यांचे सहा हात म्हणजे सहा प्रकारचं ऐश्वर्य, ज्याला षडै्श्वर्य असं म्हणतात, त्यांचे प्रतीक आहेत. एक श्रेयस आणि एक प्रेयस अशी त्यांची दोन पाऊलं आहेत. मानवाच्या जीवनाचे श्रेयस आणि प्रेयस असे जे दोन मार्ग उपनिषदांतून सांगितले आहेत, त्याप्रमाणे ज्याला जे पाहिजे ते देणारा, म्हणजे एका वेळी एकच, एक तर श्रेयस तरी मागा किंवा प्रेयस तरी मागा असे सांगणारा, या अर्थाने भगवान दत्तात्रेयांचं एक पाऊल साधारणपणे सर्व मूर्तींमध्ये पुढे असलेलं आढळतं. म्हणूनच एक पाऊल थोडंसं अग्रभागी ठेवून भक्तांच्या कल्याणासाठी त्याला जे पाहिजे ते देण्यासाठी तत्पर असणारे ते भगवान दत्तात्रेय होत. 

वेदमाता गायत्रीदेखील गायीच्या रूपात भगवान दत्तात्रेयांसोबत आढळते. त्यांच्यासभोवती असणारे चार श्वान म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. पाठभेदाने काही ठिकाणी चार वेद म्हणजे चार श्वान आहेत असंही वर्णन आढळतं. परंतु भगवान दत्तात्रेयांचं कार्य पाहता, चार पुरुषार्थांची त्यांना असलेली अखंड सोबत हेच वर्णन अधिक सयुक्तिक ठरेल. ज्याला जो पुरुषार्थ गाजवायचा आहे आणि आपलं कर्तृत्व दाखवायचं आहे, त्याला त्या पद्धतीची प्रेरणा आणि शक्ती श्री दत्तात्रेय देऊ करतात, असा याचा अर्थ आहे. भगवान दत्तात्रेयांच्या प्रतिमेचं हे वर्णन जसं आधिदैविक स्तरावरील आहे, तसंच ‘तीन शिरे सहा हात’ या रूपातील त्यांची पूजादेखील आधिदैविक स्तरावरील आहे. भगवान दत्तात्रेयांचं रूपापलीकडे असणारं मूळ स्वरूप मात्र मघाशी जसं सांगितलं तसं अ, उ, आणि म या तीन मात्रांमध्येच आहे. 

या सगळ्याचं तात्पर्य जर काढायचं झालं, तर भगवान दत्तात्रेय हे आदिगुरू आहेत. आदिगुरू म्हणजे गुरूंचे गुरू, सगळ्या गुरूंमध्ये जे काही (तत्त्व) आहे ते म्हणजे भगवान दत्तात्रेय! संप्रदाय कुठलाही असो, त्याचे परमसद्गुरू म्हणजे भगवान दत्तात्रेय. कारण तिथपासून ही गुरूपरंपरा सुरू होते. त्यांची जी कुठली प्रतिमा भक्ताला आवडेल, मग ती एकमुखी, त्रिमुखी, ओंकार स्वरूपात किंवा जी आवडेल त्या स्वरूपात आपल्या समोर ठेवली तरी हरकत नाही. आपल्या परंपरागत ग्रंथांमधील तीन शिरे सहा हात ही प्रतिमा आवडली म्हणून सगळ्यांनी तीच ठेवावी असं काही नाही. कारण बरेच वेळा लोकांच्या मनात प्रश्न उमटत असतो, की भगवान दत्तात्रेय एकमुखी आहेत की त्रिमुखी आहेत? मग दोन हात आहेत की सहा हात आहेत? या मतभेदांमध्येच भक्त बऱ्याचदा अडकलेले दिसतात. तसं काही न करता आपल्याला जी आवडेल ती प्रतिमा घ्यावी; मात्र ती केवळ प्रतिमा आहे आणि या प्रतिमेमधील हे दत्तस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे. साक्षात ब्रह्म अवतीर्ण होऊन विष्णूरूपामध्ये विचरण करीत राहिलेलं दत्ततत्त्व आहे, हे लक्षात ठेवावं. 

(‘श्री दत्तात्रेयस्तोत्र’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTBCH
Similar Posts
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
स्त्रियांचे पारंपरिक खेळ स्त्रिया आणि नवनिर्मितीचा संबंध प्राचीन आहे. वेगवेगळ्या प्रसंगांची गीतं, खेळ, उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलत आली आहे. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रीने काळानुसार त्यात भर घातली आहे.
इतिहास-पुराणातील दत्तात्रेय ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ हा लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सिद्ध झालेला ग्रंथ. श्री दत्त या अत्यंत लोकप्रिय आणि अद्भुत दैवताचे संशोधनात्मक दर्शन त्यांनी या पुस्तकातून घडविले आहे. या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language